

सांगली : कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात कार्यरत असलेला सहायक अभियंता (श्रेणी-२) संतोष अशोक कांबळे (वय ३८, रा. गल्ली नं. २, गजराज कॉलनी, शामराव नगर, सांगली) याला बिलाच्या मोबदल्यात १७ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने पंचायत समिती कवठेमहांकाळमार्फत कुची येथील रस्त्याचे मुरमीकरण आणि मळणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पुरवल्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. या पूर्ण केलेल्या कामाचे शासनाकडून बिल मंजूर होऊन ते अदा केल्याच्या मोबदल्यात २ टक्के दराने १७ हजार ४०० रुपयांच्या लाचेची मागणी संशयित सहायक अभियंता संतोष कांबळे याने केली होती.
या लाच मागणीमुळे तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून १३ ऑक्टोबर रोजी कायदेशीर तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पंचांसमोर लाचेच्या मागणीची पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान संशयित संतोष कांबळे याने १७ हजार ४०० रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून ही रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला सायंकाळी रंगेहात अटक केली.
याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई सांगली एसीबीच्या उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, मनोज निळकंठ, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश जाधव, सागर नायकुडे, रामहरी वाघमोडे, राजेश मुदगल, महेश शेंडगे तसेच चालक विठ्ठलसिंग राजपूत व जितेंद्र कदम यांच्या पथकाने केली.