

कवठेमहांकाळ : महिला कर्मचार्यांची छेड काढल्याच्या कारणातून निलंबन केल्याच्या रागातून कवठेमहांकाळचे आगार व्यवस्थापक अमर राजेंद्र निकम यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. मिरज शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दहा ते बाराजणांनी मारहाण केली असल्याची अमर निकम यांची तक्रार आहे.
याबाबत माहिती अशी, कवठेमहांकाळ आगाराकडे चालक म्हणून नियुक्तीस असणार्या तानाजी दामू यमगर याला आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी निलंबित केले होते. तानाजी यमगर याने गेल्या आठवड्यात एका महिला वाहकाची छेड काढली होती. संबंधित वाहकाने आगार व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. त्यावेळी आगारप्रमुखांनी यमगर याला समज दिली होती. त्यानंतर तानाजी यमगर याने पुन्हा आगारातील एका महिला कर्मचार्याची छेड काढली. या संबंधित महिलेनेही यमगर याच्याविरुद्ध आगार व्यवस्थापकांकडे तक्रार केली. यमगर हा वारंवार महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी वाढल्याने आगार व्यवस्थाकांनी यमगर याला निलंबित करून त्याची चौकशी सुरू केली होती.
शुक्रवारी त्याला आगारात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु तो आ. गोपीचंद पडळकर प्रणित सेवा शक्ती संघर्ष संघटनेतील काही महिला पदाधिकार्यांना घेऊन आगारात आला. यावेळी संबंधित महिलांनी तक्रार करणार्या महिलेलादेखील दमदाटी केली. त्यानंतर आगार व्यवस्थापक निकम यांच्या कार्यालयात जात त्यांना दमदाटी केली. तसेच त्यांना मारहाणदेखील केली. यावेळी उपस्थित असणार्या महिलांनी दिसेल ते साहित्य आगार व्यवस्थापकांच्या अंगावर भिरकावल्याचादेखील प्रकार घडला. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.