

आष्टा : आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पुढे मोटारीतून आलेल्या सहाजणांनी दुचाकीवरून जाणाऱ्या काका-पुतण्याला अडवून काठ्या आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून, आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
बजरंग महादेव सुतार (वय 55, रा. चांदोली वसाहत, क्रांतिनगर, आष्टा) आणि संतोष शामराव सुतार अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी शिवतेज सावंत (रा. सांगली) व इतर पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बजरंग सुतार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बजरंग सुतार हे 30 एप्रिलरोजी रात्री 7.45 च्या सुमारास त्यांचे पुतणे संतोष यांच्यासह दुचाकीवरून बोरगाव येथे काम पाहण्यासाठी निघाले होते. आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावरील बाळासाहेब अनुसे यांच्या शेताजवळ मोटारीतून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला आडवी दुचाकी मारून थांबवले. मोटारीमधील शिवतेज सावंत आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच साथीदारांनी मारहाण सुरू केली. काठ्या आणि पट्ट्याने बेदम मारत असतानाच ‘तुझा मुलगा आणि मुलगी कुठे आहेत?’ असे विचारत मारहाण केली.
संशयित पसार
या अनपेक्षित हल्ल्यात काका-पुतणे जखमी झाले आहेत. घटनेनंतर हल्लेखोर कारसह पसार झाले. या मारहाणीमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.