

आष्टा : आष्टा शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अत्यंत वाढला असून, गुरुवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चौघांवर अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठांचा समावेश आहे. जखमींवर आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिरत शेख (वय अडीच वर्षे), दुर्गेश माळी (वय ६), अशोक पवार (वय ५५) आणि श्लोक शिंदे (वय ४) अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरसेविका तेजश्री बोंडे व सचिन चौगुले यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. शहरात गेल्या अवघ्या दोन महिन्यांतील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
यापूर्वी घडलेल्या पहिल्या घटनेत एका नगरसेवकासह आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी सहा जणांना जखमी केले होते. आता पुन्हा एकाच तासात चौघांवर हल्ला झाल्याने शहरातील नागरिक, महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.