

आष्टा : शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला असून, रविवारी दुपारी आणि सोमवारी सकाळी पिसाळलेल्या एका कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातला. कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एका विद्यमान नगरसेवकासह तब्बल आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ल्यात साडेतीन वर्षांचा चिमुकला राम सावंत, राहुल लोखंडे, तबसुम मुलानी, सानिया नायकवाडी, नगरसेवक नासिरहुसेन मुजावर, बेबीआईशा आतार, सुभाष मळणगावकर आणि महम्मद मुलानी हे आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष विशाल शिंदे, आरोग्य सभापती सचिन घस्ते, नगरसेवक विजय मोरे, बाबासाहेब सिद्ध, अर्जुन माने आणि दीपक मेथे यांनी जखमींची विचारपूस केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचाराबाबत सूचना दिल्या. विलासराव शिंदे नगर, जि. प. शाळा नंबर १७ परिसर, गोर्डे चौक, मटण मार्केट चौक, सागर ज्वेलर्स, पोलिस स्टेशन रोडवर हनुमान मंदिर परिसर, गांधीनगर, डांगे कॉलेज परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. बंद पडलेली निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करावी. शाळा, महाविद्यालये, क्लासेस, बाजारपेठ, धार्मिक स्थळे आणि वर्दळीच्या ठिकाणी विशेष पथक नेमून तातडीने कारवाई करावी. शाळा सुटण्याच्या वेळेत लहान मुलांची मोठी वर्दळ असते.