

आष्टा : आष्टा-मर्दवाडी रस्त्यावरील कुंबळे मळा आणि थोटे मळा परिसरात विजेच्या तारांमधील शॉर्टसर्किटमुळे सुमारे ४० एकर आडसाली ऊस आगीत जळून खाक झाला. ही भीषण घटना सोमवार, दि. २७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. उसाच्या फडाला अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
भरदुपारी लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. उसाच्या फडांमधून आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट उठू लागले. आग अत्यंत वेगाने पसरल्याने पाहता पाहता मोठ्या क्षेत्रावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ऊसशेतीपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने अग्निशामक वाहन पोहोचू शकले नाही, ज्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मोठ्या अडचणी आल्या. स्थानिक शेतकरी आणि तरुणांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांना यश आले नाही.
या घटनेत अर्जुन चव्हाण, सुहास चव्हाण, राजू पाटील, लोडकर, कुशाल वग्याणी, नीलम पाटील, प्रकाश आवटी, काकेश चौगुले, उल्हास कुबडे आणि राजेश पाटील आदी शेतकऱ्यांचा आडसाली ऊस जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच तलाठी तसेच महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळालेल्या ऊसशेतीची पाहणी केली. ऐन हंगामाच्या तोंडावर उभा ऊस जळाल्याने बाधित शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नुकसान टळावे यासाठी संबंधित साखर कारखान्यांच्या शेती विभागाने जळालेल्या उसाची तातडीने तोडणी करून तो कारखान्याला गळितासाठी न्यावा, अशी मागणी होत आहे.