

आरग : आरग (ता. मिरज) येथील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी अशा घटना वारंवार घडत आहेत. प्रत्येक प्रभागातील रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र रस्ते पूर्ण झालेल्या भागात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.
येथील आरग ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेली जलवाहिनी फुटली. त्यामधून होणारा पाणी पुरवठा सुरू असताना रस्त्यावरून हजारो लिटर पाणी वाया गेले. घटना लक्षात येताच ग्रामपंचायत प्रशासनाने पुरवठा खंडित केला. दुरूस्तीसाठी पुन्हा या मार्गावर खुदाई करण्यात आली. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
मुख्य पाझर तलावातून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना सुरू केली. त्याव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मुख्य बाजारपेठेसह प्रत्येक प्रभागासाठी जलवाहिनी टाकण्यात आली. स्टेशन रस्ता परिसरात वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावाला होणारा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याबाबत रोहित इनामदार यांनी तक्रार दाखल केली आहे. वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या प्रकाराच्या समस्येबाबत ग्रामपंचायतीने कायमचा तोडगा काढवा, अशी मागणी होत आहे.