Sangli News| आरग गावामध्ये १४ दिवसातून एकदा पाणी

गावात कृत्रिम दुष्काळ; तलाव भरलेला, तरीही पाण्यासाठी वणवण
Water Supply
पाणीपुरवठा Pudhari
Published on: 
Updated on: 

आरग : २२ हजार लोकवस्तीच्या आरग गावाला गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावासाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशन योजना राबवूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अनेक भागांत १४ दिवसांतून एकदा केवळ तासभर पाणीपुरवठा होत आहे.

नवीन जलजीवन मिशन योजना पूर्णतः अपयशी ठरल्याने ‘जुनीच योजना बरी होती,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. बेळंकी रस्त्यावरील पाझर तलाव हा गावाच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. गेल्या दोन वर्षांत हा तलाव बहुतांश काळ भरलेला राहिला आहे. सांडव्यातून पाणी भरभरून वाहत असले, तरी ग्रामस्थांच्या नशिबी मात्र पाण्यासाठीची वणवण कायम आहे. पाण्याचा उपसा आणि वितरण या दोन्ही पातळ्यांवर ग्रामपंचायतीचे नियोजन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीवर अनेकदा घागर मोर्चे काढले; मात्र या आंदोलनांची सदस्यांना कोणतीही दखल नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नवीन योजना राबविताना नेतेमंडळींनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे कंत्राटदार वैतागल्याची चर्चा आहे. विविध मागण्यांचा ताण सहन करत योजना कशीबशी पूर्ण झाल्याचे दाखवून कंत्राटदाराने कामातून अंग काढून घेतल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात योजना अद्याप अपूर्ण आहे. आजमितीस किमान १६ कामे पूर्ण होणे बाकी असल्याचा दावा आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कंत्राटदाराकडे पाठपुरावा केला जात आहे; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

योजना अपूर्ण, तरीही पूर्णत्वाचा दाखला

योजना पूर्ण झालेली नसतानाही तत्कालीन सरपंचाने पूर्णत्वाचा दाखला दिल्याची बाब समोर आली आहे. यामागे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. या प्रकाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. काम पूर्ण झालेले नसल्याने यल्लमा मंदिराशेजारील रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले आहे. गावातील अनेक गल्ल्यांमध्ये १४ ते १५ दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. तेही अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ येत नाही. पाण्याचा दाब कमी असल्याने अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news