Sangli News| आजची पदयात्रा कायमचा कृती आराखडा व्हावा

भय व नशामुक्त अभियान समिती : नशामुक्त सांगलीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज
Sangli News
भय व नशामुक्त अभियान समिती
Published on
Updated on

सांगली : भय व नशामुक्त अभियान समिती दोन वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात जनजागृती आणि पाठपुरावा करत आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात अभियान राबवून आतापर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले असून, हे अर्ज जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांच्याकडे सादर केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज, सोमवारी सकाळी ८.३० वाजता येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली “नशामुक्ती निर्धार पदयात्रा” आयोजिली आहे.

राज्य शासनाने अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले असून, या पदयात्रेचे प्रारंभस्थळ कल्पवृक्ष मैदान, नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली असून सांगता पोलिस मुख्यालय, सांगली येथे होणार आहे.

अमली पदार्थांच्या विळख्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. माता-भगिनी, पालक, विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. या समस्येचे सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर परिणाम गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ जनजागृतीचा कार्यक्रम न करता अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी एक दिवसाची पदयात्रा नको, कायमस्वरूपी कृती आराखडा व्हावा, अशी अपेक्षा आहे.

'नशामुक्त सांगली' हा केवळ घोषवाक्याचा विषय न राहता तो जिल्ह्याचा दीर्घकालीन संकल्प झाला पाहिजे, अशी मागणी भय व नशामुक्त अभियान समिती करत आहे. दोन वर्षांपासून समितीने कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय हा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे. ३५ ते ४० हजार नागरिकांचा सहभाग, जनजागृती, अर्ज संकलन आणि प्रशासनाकडे सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे या प्रश्नाला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे. पदयात्रा संपली म्हणजे अभियान संपले असे होऊ नये. पदयात्रेनंतर खरी लढाई सुरू झाली पाहिजे, अशी भूमिका समितीने स्पष्ट केली आहे.

जिल्हा समितीचे प्रमुख कार्यकर्ते सतीश साखळकर, तानाजी सावंत, कुलदीप देवकुळे, शंभुराज काटकर, रवींद्र वळवडे, लालू ऊर्फ युसुफ मिस्त्री, उमेश देशमुख आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिलेले आहे.

हे करता येईल...

  • अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि तस्करी करणाऱ्यांवर कठोर व सातत्यपूर्ण कारवाई

  • शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि तरुणांच्या परिसरात विशेष जनजागृती व निगरानीची व्यवस्था

  • अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी प्रभावी आणि सुरक्षित यंत्रणा

  • व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, उपचार व पुनर्वसनाच्या सुविधा वाढविणे

  • प्रत्येक तालुक्यात नियमित व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविणे

  • पोलिस, महसूल, शिक्षण, आरोग्य

  • आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय साधून संयुक्त कृती आराखडा तयार करणे

  • अमली पदार्थांच्या कारवाईचा नियमित आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय कायमस्वरूपी समिती स्थापन करणे

  • शाळा-महाविद्यालये तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे

भय व नशामुक्त अभियान समिती म्हणते...

पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस प्रशासन यांनी आयोजित केलेली ही पदयात्रा निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, ही पदयात्रा केवळ फोटोसेशन, प्रसिद्धी किंवा एका दिवसाच्या कार्यक्रमापुरती मर्यादित राहू नये, अशी स्पष्ट भूमिका भय व नशामुक्त अभियान समितीची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news