

जत : जत तालुक्यातील अंकले येथे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या ७५ वर्षीय वृद्धावर तरसाने अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात माजी पोलीसपाटील बाबा ऊर्फ कोंडिबा पांडुरंग दुधाळ-पाटील यांचा मृत्यू झाला. डफळापूर-अंकले रस्त्यालगतच्या शेतात ही घटना घडली.
कोंडिबा पाटील नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या तरसाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. तरसाने त्यांच्या मानेवर, मांडीवर तसेच हातावर हल्ला केल्याने पाटील गंभीर जखमी झाले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आरडाओरडीनंतर तरस पळून गेले.
दरम्यान, अंकले गाव व परिसरात काही दिवसांपासून तरसाचा वावर असल्याची चर्चा होती. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आता तरसाने वृद्धावर थेट हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.