

सांगली : उसाला पहिली उचल प्रतिटन पाच हजार द्यावी, साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिकिलो ५५ रुपये करावी, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये करावा, ऊसतोडीस पैसे मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, वजन-काटे ऑनलाइन करावेत, या मागण्यांसाठी शरद जोशी विचार मंचतर्फे पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, भाजपचे सावकार मदनाईक, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे, वैभव कांबळे आदींनी केले.
कार्यालयासमोर पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन पाच हजार रुपये मिळाली पाहिजे. त्यासाठी साखरेची सध्याची प्रतिकिलो ३१ रुपये असलेली आधारभूत किंमत वाढवून ५५ रुपये करावी. इथेनॉलचा सध्याचा प्रतिलिटर ६० ते ६५ रुपये असलेला दर वाढवून ७५ रुपये करावा. ऊसतोडीस पैसे मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, शिवाजी माने, सावकार मदनाईक, वैभव कांबळे, भगवान काटे, रवी मोरे, प्रल्हाद इंगोले आदींनी मनोगत व्यक्त केले.