Sangli News : भाजीविक्रेते, हातगाड्यांवर कारवाई

मारूती रोडवर विक्रेत्यांनी पथकास रोखले; मुख्यालयात ठिय्या, प्रशासन कारवाईवर ठाम
Sangli News : भाजीविक्रेते, हातगाड्यांवर कारवाई
Published on
Updated on

सांगली : शहरातील मारुती रोड परिसरातील रस्ते व पदपथांवर ठाण मांडून बसलेले भाजीविक्रेते तसेच हातगाड्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने बुधवारी सायंकाळी जोरदार मोहीम हाती घेतली. मात्र, कारवाईदरम्यान भाजीविक्रेते आणि हातगाडीधारकांनी पथकाला तीव्र विरोध दर्शवला. विक्रेत्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी अडवून धरली. त्यानंतर थेट महापालिका मुख्यालय गाठून ठिय्या आंदोलन छेडले.

मारुती रोड, हरभट रोड, बालाजी चौक आणि कापडपेठ या अत्यंत गजबजलेल्या भागात रस्त्यांवर हातगाडे, फळ व भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. गणेशोत्सवात या रस्त्यांवरून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत पालिकेच्या नागरी संवाद कार्यक्रमात आयुक्त संजीता महापात्र यांच्याकडे थेट तक्रारी केल्या होत्या. भाजीविक्रेते आणि हातगाडीवाले रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने दुकानांत ग्राहक येत नाहीत, शिवाय वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनल्याचे व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या तक्रारींची गंभीर दखल घेत आयुक्त महापात्र यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला मारुती रोड परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी अतिक्रमण विरोधी विभागाची गाडी मारुती रोडवर दाखल झाली. कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील विक्रेत्यांना व हातगाड्यांना हटवण्यास सुरुवात करताच अनेक विक्रेत्यांनी आक्रमक होत गाडीसमोरच ठिय्या मारून कारवाईला विरोध सुरू केला.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक आक्रमक विक्रेत्यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले आणि आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासभर ५० हून अधिक महिला विक्रेते व हातगाडीवाले महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ठाण मांडून बसले होते. ‘आम्ही गेल्या ५० वर्षांपासून याच रस्त्यावर व्यवसाय करत आहोत, त्यामुळे प्रशासनाने आमचे रोजगार हिरावून घेणारी कारवाई करू नये’, अशी भूमिका विक्रेत्यांनी मांडली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news