

अंकली : मुधोळ तालुक्यातील सोरगाव-मुगळखोड रस्त्यावर बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. नवीन हनुमंत गोरख (वय २२, रा. जनता प्लॉट, मुधोळ) असे मृताचे नाव आहे.
नवीन गोरख हा दुचाकीवरून मुधोळकडे जात होता. त्यावेळी बदामीहून इचलकरंजीकडे जाणारी केएसआरटीसी बस मुगळखोड मार्गावरून समोरून येताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीच्या पेट्रोल टाकीला तडा जाऊन इंधनगळती सुरू झाली. क्षणार्धात दुचाकीसह बसने पेट घेतला.
अपघातानंतर नवीन गोरखला दुचाकीवरून बाहेर पडता न आल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. बसमधील प्रवाशांनी तातडीने खाली उतरून सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच मुधोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनेची नोंद मुधोळ पोलिस ठाण्यात झाली आहे.