

शिराळा : शिराळा येथे शेतात रोटर मारत असताना ट्रॅक्टर उलटून तुषार भानुदास कुंभार (वय 25, रा. सातवे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली दबल्याने तुषार गंभीर जखमी झाला होता. शिराळा येथील कदम वस्ती भागात बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दिलीप पांडुरंग कदम यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन चालक दीपक कोडींबा सुतार (वय 20, रा. सातवे, ता. पन्हाळा) हा शेतात रोटर मारण्यासाठी जात होता. तुषार कुंभार हा ट्रॅक्टरवर मागे बसला होता. सायंकाळच्या वेळी दीपक सुतार हा ट्रॅक्टर बांधावरून नेत असताना अचानक ट्रॅक्टरला मोठा झटका बसला. यामुळे तोल जाऊन ट्रॅक्टर जागेवरच उलटला.
प्रसंगावधान राखून खाली उडी घेतल्याने चालक दीपक सुतार बचावला, मात्र ट्रॅक्टरवर मागील बाजूस बसलेला तुषार कुंभार हा ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी चालक दीपक सुतार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक उदय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.