

सांगली : मित्राची परीक्षा आहे, म्हणून सकाळी लवकर उठून तो घरातून निघाला. दुचाकीवरून दोघे मित्र परीक्षेसाठी सांगलीकडे येत होते, पण वाटेत त्याच्यावर काळाने झडप घातली. ही हृदयद्रावक घटना बुधवार, दि. 16 रोजी सकाळी आठच्या सुमारास सांगलीवाडी टोलनाक्याजवळ घडली. शिवशाही बसने जोरदार धडक दिल्याने साहिल अन्सारी मुलाणी (वय 22, रा. नागठाणे, ता. पलूस) या महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (वय 19, रा. बुरूड गल्ली, यल्लम्मा चौक, इस्लामपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी प्रतीक याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला, तर बसचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी बसचालक सुनील ढगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साहिल मुलाणी हा आई व वडिलांसह नागठाणे येथे राहत होता. तो इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. कॉम.चे शिक्षण घेत होता. जखमी प्रतीक हा साहिलचा मित्र आहे. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. मंगळवारी सकाळी प्रतीक याची ‘स्टेनो’ची परीक्षा सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात होती. त्यासाठी साहिल सकाळी नागठाणे येथून दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. वाळवा येथे दुचाकी ठेवून तो बसने इस्लामपूरला आला. प्रतीक याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने साहिलने त्याची दुचाकी (एमएच 10 ईडी 4699) चालविण्यास घेतली. दोघेही परीक्षेसाठी इस्लामपूरहून सांगलीकडे येत होते.
सव्वाआठ वाजता ते सांगलीवाडी टोलनाक्याजवळ पोहोचले. याचवेळी बायपास रस्त्यावरून शिवशाही बस (एमएच 09 ईएम 1479) सांगलीहून पुण्याकडे निघाली होती. टोलनाक्याच्या पुढे मुख्य चौकात बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. बसच्या समोरील बाजूस डाव्या बाजूला धडक बसल्याने दोघेही रस्त्यावर पडले. यात साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. साहिल जागीच ठार झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून बसचालक सुनील ढगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सागर होळकर करीत आहेत.
साहिल याला इस्लामपूरला ये-जा करण्यासाठी काही महिन्यापूर्वीच नवीन दुचाकी घेऊन दिली होती. तो सांगलीला मित्रासोबत जाणार असल्याचे कळल्यावर वडिलांनी त्याला हेल्मेट घेऊन जाण्यास सांगितले, पण त्याने हेल्मेट घेतले नाही. इस्लामपूरहून सांगलीकडे मोपेडवरून निघताना प्रतीकच्या वडिलांनीही दोघांना हेल्मेट घ्या, असे सांगितले. पण दोघांनीही वडिलांचे ऐकले नाही, असे त्यांच्या एका मित्राने सांगितले.
साहिल हा इस्लामपूर येथील महाविद्यालयात शिकत होता. त्याचे वडील अन्सारी मुलाणी हे हुतात्मा बझारच्या नागठाणे शाखेत व्यवस्थापक आहेत. तो एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूने मुलाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागठाणे गावावरही शोककळा पसरली होती.