

सांगली : विश्रामबाग येथील वर्दळीच्या आलदार चौकात बुधवारी दुपारी भरधाव डंपरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवाहितेचा चिरडून जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती किरकोळ जखमी झाले आहेत.
सविता दीपक चव्हाण (वय ३९, रा. कसबेडिग्रज, ता. मिरज) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात त्यांचे पती दीपक प्रकाशराव चव्हाण हे या जखमी झाले आहेत. याप्रकरणी डंपर चालक महंमद अफसर (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
अधिक माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्य आपल्या ई-बाईकवरून (क्र. एमएच १० इबी २७९९) विश्रामबाग परिसरातून जात होते. आलदार चौकात पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र. केए २८ एए ३९२७) त्यांच्या दुचाकीला घासून कट मारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुचाकी चालविणारे दीपक चव्हाण यांचा ताबा सुटला आणि सविता चव्हाण या थेट डंपरच्या खाली सापडल्या. डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक चव्हाण हे बाजूला फेकले गेल्यामुळे किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव व वाहतूक शाखेचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. अपघाताची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. अपघातानंतर चौकात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती . काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
आलदार चौक परिसरात नामांकित शाळा, महाविद्यालये, मोठे मॉल्स आणि व्यापारी संकुले असल्याने येथे दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. पूर्वी या चौकात वाहतूक पोलिस नियमित तैनात असायचे आणि वाहतुकीचे नियमन सुरळीत चालत असे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे पोलिस कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहनधारकांकडून रस्त्यावरच बेकायदेशीर पार्किंग केले जात आहे. त्यामुळे मुख्य रस्ता चिंचोळा बनला असून वाहनांची कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता आलदार चौकात तातडीने वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.