

आष्टा : आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावरील डायमंड हॉटेलसमोर ६ जून रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी वाहनाची आणि मालवाहू ट्रकची धडक झाली. या अपघातात शिक्षक व शिक्षिकेसह दोघेजण गंभीर जखमी झाले असून, तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर १३ दिवसांनी, म्हणजेच १९ जून रोजी आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
या अपघातात संतोष श्रीकांत चौगुले (वय ४२, रा. ब्रह्मनाळ, ता. पलूस) आणि त्यांच्या पत्नी संचिता हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी सोमनाथ अनिल गुरव (वय २७), खुशबू शौकत पटेल आणि साथी दिलीप मोहिते हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चौगुले हे आपल्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि कुटुंबीयांसह एका प्रवासी मोटारीतून (क्र. केए ११ ए ५८७०) गणपतीपुळे येथे सहलीसाठी गेले होते. परत येत असताना आष्टा-ईश्वरपूर रस्त्यावर डायमंड हॉटेलजवळ चालक सागर काशिनाथ बेडगे (रा. मणेराजुरी) याने पुढे चाललेल्या मालवाहू ट्रकला (क्र. एमएच १० डीटी ३०९) पाठीमागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिली. या अपघातात संतोष चौगुले आणि त्यांच्या पत्नी संचिता चौगुले यांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता चालक सागर बेडगे घटनास्थळावरून पळून गेला. वाहनामध्ये इतरही अनेक लहान मुले आणि विद्यार्थी प्रवास करत होते, ते सर्व जण या अपघातातून सुखरूप बचावले.
अपघातात संतोष चौगुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी १९ जून रोजी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित चालक सागर बेडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.