

कुपवाड : कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोरील रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दीपक एकनाथ साळुंखे (रा. शास्त्री चौक, चौगुले प्लॉट, मिरज) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे. फिर्यादी सुनील साळुंखे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे भाऊ दीपक साळुंखे हे सोमवार, दि. 23 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच 09 एपी 5281) कुपवाडहून मिरजेकडे जात होते. एका हॉटेलसमोरील रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दीपक साळुंखे रस्त्यावर पडले. डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईश्वरपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.