

नागज : भरधाव मोटारीने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात निमज (ता. कवठेमहांकाळ) येथील प्राथमिक शिक्षक बलराज ऊर्फ बापूसाहेब लक्ष्मण रूपनर (वय ५४) यांचा मृत्यू झाला. ही घटना विजापूर-गुहागर राज्यमार्गावर रविवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी, बलराज रूपनर हे आपल्या दुचाकीवरून बिरोबा बन ते निमज रस्त्यावरून गावाकडे येत होते. दरम्यान, निमज गावाजवळ विजापूर-गुहागर राज्यमार्गावरून जतच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात रूपनर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. बलराज रूपनर हे जत तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने निमज गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.