

नागज : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात दुचाकीवरुन पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १४ रोजी दुपारी बारा वाजता घडली. नितीन नवनाथ हजारे (वय ३६, रा. राजापूर, ता. तासगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी अमावास्या असल्याने नितीन हजारे हे आरेवाडी येथील श्री बिरोबा बनात देवदर्शनासाठी आले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बनातील अंतर्गत रस्त्यावरून दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्यासमोर कुत्रे आडवे आले. यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर जोरात पडले.
अपघातात नितीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ हणमंत भगवान हजारे यांनी त्यांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.