

जत : उमदी-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर उमदी गावाजवळ शनिवार, दि. 23 रोजी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात एका 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भाऊसाहेब भीमा लोखंडे (वय 40, रा. निंबाळ, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. हा अपघात इतका गंभीर होता की, दुचाकीस्वाराचा मेंदू रस्त्यावर विखुरला होता.
हा अपघात उमदीजवळ असलेल्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मैदानाजवळ दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झाला. उमदीकडून विजापूरकडे जाणार्या दुचाकी (केए 28 एचके 2248) आणि समोरून येणार्या मालवाहू ट्रक (एमएच 12 टीव्ही 9729) यांच्यात ही धडक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यात नव्हती.