

तासगाव : धामणी (ता. तासगाव) येथे विहीर खुदाईचे काम सुरू असताना यारी अंगावर पडून महादेव आत्माराम पाटील (वय 65, रा. धामणी) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले. जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दि. 19 मे रोजी घडलेल्या या घटनेबाबत, शुक्रवार, दि. 29 रोजी रात्री उशिरा तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बबन आत्माराम पाटील (वय 65, रा. धामणी) यांनी फिर्याद दिली.
या घटनेत संजय जनार्दन शिंदे, धनाजी दशरथ पाटील, मोहन पांडुरंग पाटील, उमेश प्रल्हाद पाटील व विक्रम बाबुराव गुरव (सर्व रा. धामणी) हे पाच कामगार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी विनोद संपत सुर्वे व विजय आकाराम पाटील (दोघे रा. धामणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धामणी येथे ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील यांच्या शेतात विहीर खोदाईचे काम सुरू आहे. विहिरीतील माती व कचरा बाहेर काढण्यासाठी तिथे यारी बसविण्यात आली आहे. या कामासाठी महादेव पाटील यांच्यासह संजय शिंदे, धनाजी पाटील, मोहन पाटील, उमेश पाटील आणि विक्रम गुरव हे सर्व जण विहिरीत उतरले होते.
विहिरीच्या वर यारी चालविण्याचे काम विनोद सुर्वे व विजय पाटील हे करीत होते. यारीचे काम सुरू असताना खाली काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे. यारी व्यवस्थित न हाताळल्याने तिचा लोखंडी डबा विहिरीतून वर आल्यानंतर अचानक वेगाने पुन्हा विहिरीत जाऊन कोसळला. या डब्याखाली सापडल्याने महादेव पाटील गंभीर जखमी झाले, तर इतर पाच जणांना मोठी दुखापत झाली.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना विहिरीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महादेव पाटील यांचा मृत्यू झाला. इतर पाच जखमींवर उपचार सुरू आहेत.