

आटपाडी : आदमापूर येेथे देवदर्शन करून परतणाऱ्या खंडाळी (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील भाविकांच्या टेंपोला आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव टेंपो अचानक उलटल्याने ११ वर्षीय अल्फाज गफूर तांबोळी (रा. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा मृत्यू झाला, तर या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य १७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळी येथील तांबोळी व अत्तार कुटुंबीय शनिवारी आदमापूर येथे दर्शनासाठी गेले होते. रविवारी दर्शन आटोपून सर्वजण टेंपो (एमएच ४५ एएफ ५९६२) मधून गावी परतत होते. सायंकाळी ते माणगंगा साखर कारखान्याच्या पाटीजवळ आल्यानंतर टेंपो अचानक रस्त्यावर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनातील प्रवासी एकमेकांवर आदळले. यात अल्फाज तांबोळी हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सबिना लतिफ तांबोळी, हसीना तांबोळी (वय ४०) आणि माहीम अत्तार (वय ९) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच चालकासह अन्य १७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.