Sangli Accident: ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

कसबे डिग्रज येथे पहाटेच्यावेळी प्रकार
Accident
Accident
Published on
Updated on

​सांगली : सांगली ते ईश्वरपूर रस्त्यावर कसबे डिग्रज (ता. मिरज) गावच्या कमानीजवळ पहाटे 'मॉर्निंग वॉक'साठी बाहेर पडलेल्या ६२ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात गणपती बिराप्पा पांडेगावकर (रा. कसबे डिग्रज) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घडला. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

पांडेगावकर हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे सांगली ते पेठ मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. कसबे डिग्रज कमानीपासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, पांडेगावकर महामार्गावरून थेट खाली फेकले गेले. रस्ता उंचावर असल्यामुळे आणि ते खाली पडल्यामुळे पहाटेच्यावेळी हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. सकाळ झाल्यानंतरही ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. सकाळी नऊच्या सुमारास महामार्गाच्या खाली रस्त्याकडेला ते मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे कसबे डिग्रज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news