

इस्लामपूर : येथील बसस्थानक परिसरात कार-दुचाकी अपघातातील जखमी हर्षद बापू सकटे (वय 21, रा. पेठ) याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हा अपघात मंगळवारी (ता. 17) रात्री झाला होता. अपघातात सकटे याचा मित्र आकाश चंद्रकांत बाबर (रा. पेठ, वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला होता. आकाश यांचा चुलत भाऊ प्रसाद बाबर याने फिर्याद दिली होती.
मंगळवारी (दि. 17 ) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आकाश व हर्षद हे दोघे इस्लामपूर येथे आले होते. त्यानंतर चुलत भाऊ प्रसादला भेटून ते मोटरसायकल (एमएच 10 ईपी 6140) वरून पेठकडे परत निघाले होते. दरम्यान, इस्लामपूर बसस्थानकाजवळ भरधाव कारने (एमएच 06 एएफ 4247) त्यांना जोराची धडक दिली होती. या धडकेत आकाशचा जागीच मृत्यू झाला होता, तर हर्षद गंभीर जखमी होता. त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हर्षद हा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याच्या मागे आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.