

पलूस : बांबवडे येथे कराड-तासगाव रोडवर वृद्ध पादचाऱ्यास जोराची धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अपघातात 71 वर्षीय सर्जेराव आनंदा जाधव यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास संतोष पोल्ट्री फॉर्म, बांबवडे परिसरात ही दुर्घटना घडली. सर्जेराव जाधव हे रस्ता ओलांडत असताना कराड-तासगाव रोडवरून भरधाव वेगात येणाऱ्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील अज्ञात चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर मृताचा मुलगा संग्राम सर्जेराव जाधव (वय 22, रा. बांबवडे) यांनी पलूस पोलिस ठाण्यात वर्दी दाखल केली. दुचाकीच्या अज्ञात चालकाचा शोध घेण्यासाठी पलूस पोलिस तपास सुरू असून स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी आलेल्या वाहनासंबंधी माहिती असल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.