Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

शिराळा–बिऊर मार्गावर अपघात; मृत बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर
Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

शिराळा : शिराळा ते बिऊर मार्गावरील फत्तेसिंगराव नाईक पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या मोटारीने दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऊसतोड मजूर तरुण आणि त्याच्यासोबत असलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. प्रवीण बाबू यमगर (वय २२) आणि नंदिनी दगडू सदगर (वय १६, दोघेही मूळ रा. बीड) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण यमगर हा दुचाकीवरून नंदिनी सदगर हिला सोबत घेऊन शिराळा येथे देवदर्शनासाठी आला होता. देवदर्शन करून परत जात असताना शिराळा–बिऊर मार्गावर पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या मोटारीने (क्र. एमएच ०९ एफक्यू ५३१०) जोरदार धडक दिली.

या धडकेत नंदिनी ही मोटारीच्या पुढील भागावर आदळून रस्त्यावर पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. प्रवीण याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

अपघातानंतर चालक मोटार घटनास्थळीच सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रवीण याचे चुलते संदीप किसन यमगर यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news