

ईश्वरपूर : येथील बसस्थानक परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. दिलीप मारुती माने (वय ७५, रा. कोळी मळा, ईश्वरपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवार, दि. १७ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी डंपरचालक समीर संजय गुजर (वय ३४, रा. नेर्ले, ता. वाळवा) याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत दिलीप यांचे नातू अथर्व यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
दिलीप माने दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीए ८०४५) मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल असलेल्या मित्रास भेटण्यासाठी निघाले होते. बसस्थानक परिसरात पाठीमागून आलेल्या डंपरने (क्र. एमएच १० ईक्यू ४५३०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे दिलीप माने रस्त्यावर कोसळले आणि डंपरचे चाक छातीवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. येथील उपजिल्हा रुग्णालयात दिलीप माने यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पुढील तपास ईश्वरपूर पोलिस करीत आहेत.
चव्हाण कॉर्नर ते डॉ. आंबेडकर चौक रस्ता बनला मृत्यूचा सापळा
ईश्वरपूर येथील चव्हाण कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्त्यावर वारंवार भीषण अपघात घडत आहेत. गेल्या वर्षभरात या रस्त्यावर झालेल्या विविध अपघातांत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. बसस्थानक परिसरात वाढलेली अतिक्रमणे, रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि दोन्ही मार्गिकांमधील (लेन) कमी असलेले अंतर यामुळे येथे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.