

सांगली : तुंग (ता. मिरज) येथे रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शिवकुमार श्रीकांत पाटील (वय 29, रा. ढवळी, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे; तर यशवंत वसंत पाटील (रा. फार्णेवाडी, ता. वाळवा) हा जखमी झाला. गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
शिवकुमार पाटील व त्याचा मित्र यशवंत पाटील हो दोघेजण गुरुवारी रात्री दुचाकी (एमएच 09 एजे 7436) वरून ढवळीकडे जात होते. तुंग येथील एका नर्सरीसमोर रात्री साडे नऊच्या सुमारास ट्रक (आरजे 09 जीडी 3943) रस्त्यावरच थांबविण्यात आला होता. ट्रक रस्त्याकडेला उभा केल्यानंतर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टरही लावलेला नव्हता. तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे तो धोकादायक स्थितीत उभा होता. त्याचवेळी शिवकुमार याला अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही. दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार याच्या डोक्याला, कपाळाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. ट्रक चालकाने रिफ्लेक्टर तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करत केबिन पेटवून दिली. त्यामुळे काही वेळातच केबिन जळून खाक झाली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.