

मिरज : वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयिताने पोलिस ठाण्याच्या आवारातच मंगळवारी सायंकाळी पत्नीसह विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संशयित सागर ऊर्फ नानासो माणिक चौगुले (रा. अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ) व त्याची पत्नी निकिता चौगुले या दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
गुरुवार, दि. ११ जून रोजी घरात घुसून वेदांत बंडगर या १४ वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य संशयित नीलेश गडदे याच्यासह पाच जणांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यामध्ये सागर चौगुले याचाही समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सागर फरार होता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके त्याच्या मागावर होती.
दरम्यान, फरार असलेला सागर चौगुले मंगळवारी सायंकाळी पत्नीसह कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या परिसरात दाखल झाला. त्याने सुरुवातीला पोलिस ठाण्याबाहेर विषारी द्रव प्राशन केले आणि नंतर पोलिस ठाण्याच्या आत जाऊन पुन्हा विषारी द्रव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीला विष घेताना पाहून पत्नी निकिता हिनेही पोलिस ठाण्याच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने दोघांना कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असली, तरी त्यांना २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.