Sangli News : ‘बेवारस’ भंगार वाहनांना रस्त्यावर ‘अभय’

वाहतुकीला अडथळा; शहराचे विद्रुपीकरण : जप्तीचा आदेश निघाला, कारवाईची चाके फिरणार कधी?
Sangli News
‘बेवारस’ भंगार वाहनांना रस्त्यावर ‘अभय’
Published on
Updated on

सांगली : शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यालगतच्या साईडपट्ट्यांवर 'बेवारस' भंगार वाहने वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. अनेक वाहनांचे अक्षरशः सांगाडे उरले असून काही वाहने झाडाझुडपांत बंद अवस्थेत आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडत आहे. विशेष म्हणजे बंद आणि बेवारस वाहने आता मोकाट कुत्र्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. 'बेवारस' स्थितीतील अशी वाहने जप्त करण्याचे आदेश महापौरांनी महासभेत दिले, पण प्रशासनाकडून कारवाईची चाके कधी फिरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ तसेच सार्वजनिक ठिकाणी अनेक वाहने दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी उभी आहेत. काही वाहनांचे सुटे भाग काढून नेण्यात आले आहेत, तर काही वाहनांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या वाहनांमध्ये पाणी साचण्याबरोबरच परिसरात अस्वच्छताही निर्माण होते. या वाहनांच्या अडोशाला मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे.

अतिक्रमणासोबत भंगार वाहनांवरही कारवाईची गरज

रस्ते, फूटपाथ आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमणाची समस्या शहरात गंभीर आहे. दुकाने, गॅरेजजवळील भंगार, रस्त्यावर ठेवलेले साहित्य यासोबतच नादुरुस्त वाहने, बंद अवस्थेत धूळ खात उभी असलेली वाहने सार्वजनिक जागा अडवून आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सर्वेक्षण करून अशा वाहनांची यादी तयार करावी, वाहनमालकांना नोटीस देऊन ठराविक मुदतीत वाहने हटविण्याचे आदेश द्यावेत, मुदतीनंतर वाहने जप्त करून त्यांची कायदेशीर विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

एकीकडे सौंदर्यीकरण; दुसरीकडे विद्रुपीकरण

महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांच्‍या सुशोभीकरणावर भर दिला आहे. नवीन उद्याने, रस्ते सुशोभीकरण तसेच विविध विकास कामांवर भर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे याच रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्षे भंगार वाहने पडून असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणावरच पाणी फेरले जात आहे. शहर सुंदर करण्यासाठी केवळ नवीन कामे करणे पुरेसे नाही, तर सार्वजनिक जागा व्यापून ठेवणारी अतिक्रमणे आणि 'बेवारस' स्थितीतील वाहने हटविणेही आवश्यक आहे. भंगार वाहनांमुळे रस्त्याची जागा अडते, पार्किंगची समस्या वाढते आणि पादचारी तसेच वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर, रस्त्यांच्या बाजूला, सार्वजनिक ठिकाणी उभी असलेली वाहने व अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news