सांगली: पलूस येथील शेततळ्यात घुसलेली मगर सापडली

सांगली: पलूस येथील शेततळ्यात घुसलेली मगर सापडली

पलूस; पुढारी वृत्तसेवा: पलूसमधील घोरपडे मळा, शिवाजीनगर येथील अमर घोरपडे यांच्या शेततळ्यात मगर आढळून आली. आज (दि.२१) सकाळी कडेगाव – पलूस वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे व प्राणीमित्र मोहसीन सुतार यांनी या मगरीस सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पलूस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतूराज कदम यांनी या मगरीची वैद्यकीय तपासणी केली. साडेसात फुटाची ही मादी जातीची मगर सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. या मगरीस कृष्णाकाठी सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वावर असणारी मगर ७ ते ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेततळ्यात आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २०१९ च्या महापुरात कॅनॉल अथवा ओढ्याच्या मार्गाने मगरीने या परिसरात स्थलांतर केल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. पलूस कार्यालयातील वन कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी अमर घोरपडे यांच्या शेततळ्यात मगर आढळून आली.

सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे व सहायक वनसंरक्षक (वनीकरण) सांगली डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण यांनी या मगरीला अनैसर्गिक अधिवासातून ताब्यात घेण्याची मोहीम आखली. त्यानुसार गेले तीन दिवस या शेततळ्यातील पाणी पूर्णपणे उपसण्यात आले आहे. त्यानंतर या मगरीला आज सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, कोणताही वन्यप्राणी घरामध्ये अथवा परिसरामध्ये आढळून आल्यास किंवा सापडल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ वनविभागास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर दयावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news