

सांगली : वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त असलेली ७० पदे महापालिकेमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यासाठी बाह्यस्त्रोत एजन्सी नियुक्त करून त्याच्या खर्चास मान्यता देण्याचा विषय सोमवार दि. ७ डिसेंबरच्या महासभेत आला आहे. या बरोबर २०२६-२७ च्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय पुनर्विनियोजन करण्याचा विषय देखील महासभेत चर्चेला आला आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार दि. ७ रोजी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या सभेत वारणाली हॉस्पिटलमधील पद भरतीचा विषय आला आहे. वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील नोकरभरतीचा विषय यापूर्वी महानगरपालिकेच्या महासभेत चर्चेला आला होता. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेल्या सर्व पदांना शासनाची मंजुरी मिळवून ती पदे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच हॉस्पिटल प्रभावीपणे सुरू करण्याची भूमिका मांडली होती. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
शासनाकडून १०८ पदे भरण्याबाबत आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३८ पदांना राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मान्यता मिळालेली आहे. उर्वरित ७० पदभरतीसाठी बाह्यस्त्रोत एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा विषय सभेत आला आहे. शिवाय राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील रिक्त व बाह्यस्त्रोत एजन्सीकडून भरावे लागणार्या किमान वेतनापेक्षा कमी मानधन असणार्या पदांकरीता किमान वेतन फरक खर्च व इतर खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे.
तसेच २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय पुनर्विनियोजन करण्याच्या मान्यतेसाठी महासभेत विषय आला आहे. सध्या स्थानिक विकास निधी उपलब्ध नसल्याने नगरसेवकांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील दुसर्या विभागाचा शिल्लक निधी नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीसाठी किंवा अन्य विकासासाठी वळविला जाऊ शकतो. यावर महासभेत चर्चा होईल आणि मान्यता मिळेल.