सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील शेरीनाल्याच्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 45 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया संयंत्र) उभारला जाणार आहे. त्यासाठी 62 कोटी रुपये उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील लक्षवेधीवर दिली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृष्णा नदीचे प्रदूषण व त्यामुळे मृत झालेले मासे यावरून विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, दत्त इंडिया कारखाना व स्वप्नपूर्ती डिस्टिलरीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. कारखाना व डिस्टिलरी बंद केली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातून 80 एमएलडी सांडपाणी निर्मिती होते. त्यापैकी 50 एमएलडी सांडपाण्यावर (धुळगाव योजना, ऑक्सिडेशन पॉण्ड) प्रक्रियेची क्षमता आहे. उर्वरीत 30 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 45 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारले
जाणार आहे. त्यासाठी 62 कोटींचा निधी शासनाकडून महापालिकेला उपलब्ध होणार आहे.
दरम्यान कुपवाड सांडपाणी योजनेला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे कुपवाड व परिसरातील सांडपाणी शेरीनाल्याकडे येणार नाही. त्या सांडपाण्यावर कुंभारमळा येथे प्रक्रिया होणार आहे. शुद्ध केलेले पाणी पुढे ओढ्यातून सोडले जाणार आहे. हनुमाननगर येथील ऑक्सिेडेशन पॉण्ड 23 एमएलडी क्षमतेचे आहे. सध्या साडेबारा एमएलडी क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्याठिकाणीही पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जाऊ शकते. शेरीनाल्यातून कृष्णेत मिसळणार्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी ट्रक टर्मिनस जवळ 45 एमएलडी क्षमतेचा एसटीपी उभारण्यात येणार आहे.