

सांगली : महापालिका क्षेत्रात अमली पदार्थांसंदर्भातील 60 ‘डार्क स्पॉट’वर सीसीटीव्ही कॅमेरे सर्व्हिलन्स यंत्रणा बसवण्यासाठी 4.94 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यास व या कामास येणार्या खर्चास मान्यतेचा विषय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला. रस्ते रुंदीकरणामुळे जलवाहिन्या स्थलांतर, तसेच जुन्या कालबाह्य जलवाहिन्या बदलण्याच्या 2.15 कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात आली.
महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. आयुक्त सत्यम गांधी अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त विजया यादव, उपायुक्त अश्विनी पाटील तसेच सहायक आयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय नार्को समन्वय समितीअंतर्गत डार्क स्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सर्व्हिलन्स यंत्रणा पुरवणे व बसवण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून 4.94 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यास मान्यता देण्यात आली. याकामी येणार्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
सांगली शहरातील कर्नाळ रोड आणि कोल्हापूर रोड या मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांचे स्थलांतर करणे, तसेच खणभाग, हिंदू-मुस्लिम चौक परिसरापासून धनगर गल्ली चौकापर्यंतची जुनी कालबाह्य वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी दर करारास मुदतवाढ आणि 2.15 कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 9 मधील सि.स.नं. 6354/245 या महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये आमदार सुधीर गाडगीळ क्रीडा प्रबोधिनी क्रीडांगण विकसित करण्यासाठी निविदा मागवण्यास व 28.59 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. कुपवाड येथील प्रभाग 2 मधील चर्मकार समाज स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी 26.95 टक्के कमी दराच्या निविदेस मंजुरी देण्यात आली.