सांगली :पूर नियंत्रण, पाणी निचर्‍यासाठी 500 कोटी

आयुक्त शुभम गुप्ता : सर्वेक्षण सुरू; उपाययोजनांचा प्रस्ताव जागतिक बँकेला होणार सादर
Flood Control Project
सांगली :पूर नियंत्रण, पाणी निचर्‍यासाठी 500 कोटीpudhari photo
Published on
Updated on

सांगली : पूरनियंत्रण, पूर व पावसाच्या साचणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेला जागतिक बँकेकडून सुमारे 500 कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. कामांचा आराखडा तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. त्याद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होईल. तो शासनामार्फत जागतिक बँकेला सादर होईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

सांगली, कोल्हापूरमध्ये येणार्‍या महापूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून 3 हजार 200 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जुलै 2024 मध्ये जागतिक बँकेचे पथक सांगलीत आले होते. त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली. सविस्तर माहितीही घेतली. महापालिकेने जागतिक बँकेच्या पथकापुढे 463 कोटी रुपयांच्या कामांचे सादरीकरण केले होते. त्यात शामरावनगर तसेच महापालिका क्षेत्रातील अन्य 73 ठिकाणी साचणारे पावसाचे व पुराचे पाणी याचा निचरा होण्यासाठीच्या कामांचा समावेश होता.

दरम्यान, पूरनियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून कामांचा आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या ‘मित्रा’ या संस्थेने ‘प्रायमो’ या एजन्सीची नियुक्ती केलेली आहे. या एजन्सीमार्फत सांगलीत सर्वेक्षण सुरू आहे.

शामरावनगर परिसरात महापूर आणि पावसाच्या साचणार्‍या पाण्याचा निचरा तसेच महापालिका क्षेत्रात अन्य 73 ठिकाणी साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा, शहरात शिरणार्‍या पुराच्या पाण्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना या अनुषंगाने सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यास सविस्तर प्रकल्प आराखडा तयार होईल. तो महिनाभरात शासनामार्फत जागतिक बँकेला सादर होईल. जागतिक बँकेकडून उपलब्ध होणार्‍या 3 हजार 200 कोटींपैकी सांगली महापालिकेला सुमारे 500 कोटी रुपये निधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयुक्त गुप्ता यांनी दिली.

‘ई-बस’ डेपो जागेचा वाद न्यायालयात

महापालिकेमार्फत प्रधानमंत्री ई-बस सेवा राबविली जाणार आहे. महापालिकेला 50 ई-बसेस मिळणार आहेत. दैनंदिन देखभाल व दुरुस्ती एजन्सी शासनस्तरावरून निश्चित झालेली आहे. बस डेपो, चार्जिंग सेंटरसाठी मिरजेत महापालिकेची जागा निश्चित करण्यात आली होती. डेपो व चार्जिंग स्टेशन उभारणी कामाची निविदा प्रक्रियाही झालेली आहे, मात्र जागेच्या मालकीचा वाद उपस्थित झाला आहे. त्यावर 16 जानेवारीला जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

वारणा उद्भव पाणी योजनेसाठी सर्वेक्षण

वारणा उद्भव योजनेसाठी सर्वेक्षण सुरू आहे. 300 कोटींची ही योजना आहे. समडोळीच्या कोळकी भागातून वारणा नदीपात्रात जॅकवेल, जॅकवेल ते माळबंगला सुमारे साडेअकरा किलोमीटर पाईपलाईन, माळबंगला येथे सुमारे 90 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, दहा ते पंधरा जलकुंभ आणि गावठाणातील जुनी सुमारे 500 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बदलणे व नवीन पाईपलाईन आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. कामाचा आराखडा तयार झाल्यानंतर प्रस्ताव शासनाला मान्यतेसाठी सादर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news