

सांगली ः जादा परताव्याचे आमिष दाखवत सांगलीतील किराणा व्यापार्याची 20 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयकुमार वर्मा, आकांक्षा चुबे आणि आमांन्सा अन्वी (पूर्ण पत्ता माहिती नाही) यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपचंद रिकबचंद लुक्कड (रा. टीव्हीएस शोरूमनजीक, माधवनगर रस्ता, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 19 ते 30 मे 2025 या कालावधीत घडला.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी लुक्कड यांचा किराणा माल विक्रीचा व्यवसाय आहे. 19 ते 30 मे 2025 या कालावधीत संशयित तिघांनी त्यांच्याशी संपर्क करून ओळख वाढविली. त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. लुक्कड यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर संशयितांनी 22 लाख 50 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार लुक्कड यांनी रक्कम जमा केली. त्यातील 1 लाख 62 हजार रुपये संशयितांनी परतावा म्हणून लुक्कड यांना परत दिले. उर्वरित 20 लाख 80 हजारांची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ सुरू केली. लुक्कड यांनी रकमेसाठी सातत्याने पाठपुरावा केला, पण संशयितांनी त्यांना दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लुक्कड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तीनही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.