सांगली : वर्षभरात जिल्ह्यात 1800 बेपत्ता, तर 66 बेवारस मृत

महिलांचे प्रमाण अधिक ः 1339 बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात यंत्रणेला यश
Sangli Crime News
सांगली जिल्ह्यात वर्षभरात 66 बेवारस मृतदेह आढळून आले
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यात वर्षभरात 66 बेवारस मृतदेह आढळून आले. पैकी काही मृतदेहांची ओळख पटविण्यात आली असली, तरी उर्वरित मृतदेहांवर पोलिस व स्थानिक प्रशासनाने अंत्यसंस्कार केले आहेत. तर जिल्ह्यातून 1800 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी 355 जणांचा पत्ता सापडलेला नाहीत.

शहर आणि ग्रामीण भागात आढळलेल्या बेवारस मृतदेहांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे. सर्वाधिक मृतदेह पन्नासपेक्षा अधिक वयोगटातील आहेत. या व्यक्तीचा मृत्यू आजारपण, वृद्धत्व आणि अपघाताने झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. किरकोळ कारणावरून घराच्या मंडळीशी बिनसल्यानंतर अनेकजण घर सोडून शहरात वास्तव्यास येतात. अनेकजण भीक मागून जगण्याचा प्रयत्न करतात. मात्र मानसिकता खालवल्याने भीक मागणेही शक्य होत नाही. ऊन, पाऊस, थंडी झेलत रस्त्याकडेलाच मळलेल्या कपड्यात जीवन जगण्याची धडपड सुरू असते. त्यातून अनेकांना विविध आजारांची लागण होते. त्यातच अन्न पाणी व उपचाराविना त्यांचा मृत्यू होतो. शहरातील नदीकाठचा परिसर, मुख्य रस्ते आदी ठिकाणी मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी अनेक जण फिरस्ते, भटके, भिक्षेकरी आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

असा होतो तपास

जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद होते. मृतदेह सापडलेले ठिकाण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्यांना कळविण्यात येते. त्या पोलिस ठाण्याचे अंमलदार पंचनामा करतात. अंमलदारांकडे अकस्मिक मृत्यूचा तपास दिला जातो. मृत व्यक्तीजवळ आढळलेल्या कागदपत्रातून प्राथमिक तपास केला जातो. त्यातून ओळख पटली नाही तर तसा अहवाल वरिष्ठांना सादर करून पुढील कार्यवाही केली जाते.

सर्वाधिक स्त्रिया बेपत्ता

रागाच्या भरात घरातून निघून गेला. कामानिमित्त बाहेर गेला आणि परत आलाच नाही, अशा तक्रारी दररोज जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या पोलिस ठाण्यात येतच असतात. जिल्ह्यात बेपत्ता व्यक्तीचे प्रमाणही दिवसागणिक वाढत चालले आहे. 2024 मध्ये 1787 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यात सर्वाधिक प्रमाण स्त्रियांचे आहे. जिल्ह्यातून 1159 महिला हरविल्या होत्या. त्यापैकी 880 महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अजूनही 284 महिला बेपत्ताच आहेत. 630 पुरुषही बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत आहे. त्यापैकी 459 व्यक्ती मिळून आल्या असून 171 पुरुषांचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

ओळख कशी पटवतात?

बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिस अकस्मिक मृत्यूची नोंद करतात. संबंधित मृत व्यक्तीजवळ सापडलेल्या कागदपत्रातून नातलगांचा शोध घेतला जातो. आधारकार्ड व इतर कागदपत्रावरून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या संपर्कातील नातलगांशी संपर्क साधून माहिती दिली जाते. अनेकदा बेवारस व्यक्तीकडे ओळखीचा पुरावाच मिळत नाहीत. तेव्हा त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर असते. ओळख न पटल्यास मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात येतो. पाच ते सात दिवस नातलगांची वाट पाहिली जाते. त्यानंतर बेवारस मृतदेहावर पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यासाठी पोलिसांना अंत्यसंस्काराचा खर्च करावा लागतो.

बेपत्ता व्यक्तींचा शोध

एखादा पुरूष, महिला बेपत्ता झाल्यास त्यांच्या नातलगांकडून पोलिस ठाण्यात फिर्याद दिली जाते. फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय जिल्हा मुख्यालयात बेपत्ता व्यक्तींच्या फोटोचे प्रदर्शनही भरविले जाते. बेपत्ता व्यक्तीकडे मोबाईल असेल तर सायबर पोलिसांच्या मदतीने लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात बंदोबस्तासाठी तैनात कर्मचार्‍यांना बेपत्ता व्यक्तीची माहिती देऊन शोध घेण्याची सूचना केली जाते. बेपत्ता व्यक्तीचे नातेवाईकही गर्दीच्या ठिकाणी पोस्टर लावतात. त्याचाही फायदा होऊन बेपत्ता व्यक्तीचा शोध लागला आहे.

बेवारस मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांकडून पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात पाठविला जातो. शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण समोर येते. अशा अनेक व्यक्तींची ओळखच पटत नाही. तेव्हा मृतदेह शवागारात ठेवला जातो. नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू असते. नातलग मिळून न आल्यास स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जातात. मृताचे कपडे, फोटो, अंगावरील खुणा संकलन करून ठेवले जाते. शासकीय प्रसिद्धी, समाजमाध्यमे, पोलिस पाटील ग्रुप, मिसिंग डाटाच्या माध्यमातून बेवारस व बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला जातो. जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना माहिती कळविली जाते.
सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news