

जत : भिवर्गी फाट्याजवळ शेळ्या-मेंढ्यांच्या व्यापाऱ्यांना अडवून मारहाण करून दरोडा टाकल्याच्या प्रकरणाचा उमदी पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी चौघांना अटक करून त्यांच्याकडून १३ लाख रुपये रोख रकमेसह १७ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौघांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. आणखी तीन संशयितांचा शोध सुरू आहे.
गणेश बिराप्पा पांढरे (२१, रा. मुंजेवस्ती, पांढरेवाडी), शांताराम बसवंत शिंदे (३०, रा. आसंगी तुर्क), गौरव दादासो चौगुले (२३) आणि आकाश पाराप्पा नेमाणे (२३, दोघे रा. कुलाळवाडी, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
११ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास भिवर्गी फाट्यापासून सुमारे एक किलोमीटरवरील डांबरी रस्त्यावर हा प्रकार घडला. तामिळनाडूतील सेलम येथील व्यापारी एम. रवी व त्यांचे साथीदार जनावरे घेऊन जात असताना आरोपींनी त्यांचा ट्रक अडवून त्यांना मारहाण केली. धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला.
आरोपींनी ट्रकमधील लाकडी बॉक्स फोडून एक लाख रुपये रोख तसेच दोन मोबाईल जबरदस्तीने नेले होते. पोलिसांनी आरोपींकडून १३ लाखांची रोकड, गावठी कट्टा, जिवंत राऊंड, चाकू, दोन दुचाकी, दोन महागडे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
विसंगतीमागे दडलंय काय?
लुटीच्या रकमेबाबत सुरुवातीपासूनच विसंगती होती. दै. ‘पुढारी’ने याबाबत प्रकाशझोत टाकला होता. एसपींकडून सुमारे २० लाखांची, तर उमदी पोलिस ठाण्याकडून नऊ लाख रुपयांची लूट झाल्याची माहिती मिळाली होती. व्यापाऱ्यांकडून ३० लाख रुपये व पाच तोळे सोन्याची साखळी लुटल्याचीही चर्चा होती. आता पोलिसांनी आरोपींकडून १३ लाख रुपये रोख जप्त केल्याने या विसंगतीमागे नेमके काय दडले आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.