

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात दीड महिने सतत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच 29 पैकी 15 तलाव तुडुंब भरले आहेत. तर उर्वरित 6 तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे.
यावर्षी तालुक्यात सर्वत्र पंधरा मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आठ जुलैपर्यंत तालुक्यात सरासरीच्या 133 टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात 201 मिलिमीटर, तर आठ जुलैपर्यंत 235 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे अजून दोन ते तीन महिने असल्याने सरासरीपेक्षा जादा पाऊस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तालुक्यात आतापर्यंत खरिपाच्या केवळ 40 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाने उघडीप न दिल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. आणखीन काही दिवस असाच पाऊस राहिला, तर अनेक शेतकर्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
रेठरेधरण, कार्वे, येलूर, कामेरी- 1, ढगेवाडी , ओझर्डे , भाटवाडी, कामेरी -2, इटकरे, सुरूल, ताकारी, शेखरवाडी, धुमाळवाडी, डोंगरवाडी, वाटेगाव हे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उर्वरित तलावातील सध्याचा पाणीसाठा टक्केवारी पुढीलप्रमाणे - वशी (90 टक्के), माणिकवाडी (80), येडेनिपाणी -1 (85), येडेनिपाणी-2 (55), मरळनाथपूर (85), ओझर्डे (85), पोखरणी-1 (60), पोखर्णी- 2 (55), गोटखिंडी-1 (65), गोटखिंडी - 2 (55), गोटखिंडी-3 (60), दुधारी (90), भवानीनगर (45).