Sangli news: जिल्ह्यात 145 ग्रामपंचायतींवर प्रशासक

सीईओ विशाल नरवाडे यांचे आदेश : विद्यमान सरपंचाकडेच असणार कारभार
Gram Panchayat
ग्रामपंचायतFile Photo
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी अखेर प्रशासक आणि प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. जिल्ह्यातील 145 ग्रामपंचायतींमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांपर्यंत किंवा निवडणुका होईपर्यंत ही समिती कारभार पाहणार आहे.

शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही केली. आदेशानुसार, संबंधित ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच व सदस्य यांचा समावेश असलेली प्रशासकीय समितीही कारभारात सहभागी असेल. या समितीचा कार्यकाळ कमाल सहा महिन्यांपर्यंत राहणार आहे.

दरम्यान, या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुका पार पडून लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आल्यास प्रशासक व प्रशासकीय समितीचे अस्तित्व आपोआप संपुष्टात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजात खंड पडू नये, यासाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरज तालुक्यातील एरंडोली आणि अंकली ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत 8 फेब्रुवारीरोजी संपली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली असतानाही येथे अद्याप प्रशासक नियुक्तीचे आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार नेमका कोणाच्या अखत्यारीत राहणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासक नियुक्ती न झाल्यास ग्रामपंचायत अधिकारीच सर्व कामकाज पाहणार का, याबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सात गावांत प्रशासक नियुक्तीचा प्रश्न

जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतींची मुदत संपली असली तरी, त्यापैकी केवळ 145 गावांमध्येच प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित 7 ग्रामपंचायतींमध्ये अद्याप प्रशासक नेमण्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत माहिती विचारण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news