Sangli Municipal Corporation : शहरातील १२८ भूखंड कागदपत्रांच्या फेऱ्यात

पूर्ततेनंतरच महापालिकेचे नाव : नऊ प्रकारची कागदपत्रे, नकाशे सादर करण्याची सूचना
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : बिनशेती झालेल्या क्षेत्रातील खुली जागा आणि अंतर्गत रस्ते महापालिकेच्या नावावर करण्याचा प्रस्ताव कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकला आहे. शहरातील १२८ प्रकरणांमधील खुल्या जागा आणि रस्त्यांच्या क्षेत्राची नोंद महापालिकेच्या नावावर करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करण्याचे निर्देश अप्पर तहसीलदारांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मोजणी नकाशे, बिनशेती आदेश, सातबारा उतारे यांसह नऊ प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या पूर्ततेसाठी किती कालावधी लागणार, यावर हा प्रस्ताव किती रखडणार हे अवलंबून राहणार आहे.

महापालिका क्षेत्रात बिनशेती झालेल्या क्षेत्राच्या प्रमाणात खुली जागा, अंतर्गत रस्ते आणि इतर आरक्षित तसेच सार्वजनिक वापरासाठी सोडलेले क्षेत्र कब्जेपट्टीद्वारे महापालिकेच्या ताब्यात देणे बिनशेती आदेशातील अटीप्रमाणे बंधनकारक होते. मात्र, बिनशेती झालेल्या किंवा गुंठेवारीच्या क्षेत्रातील अनेक खुल्या जागा व रस्त्यांखालील क्षेत्रावर विकसक, मूळ मालक अथवा गृहनिर्माण संस्था यांचीच नावे कब्जेदार सदरी राहिली आहेत. अशा काही जागांची बेकायदेशीर विक्री किंवा हस्तांतरण झाल्याची प्रकरणेही आढळून आली आहेत.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाने १९८६ ते २०२५-२६ या कालावधीतील महसूल अभिलेखांची तपासणी केली. त्यामध्ये सांगली शहर, संजयनगर आणि विश्रामबाग परिसरातील १२८ प्रकरणांमध्ये खुल्या जागा आणि रस्त्यांची नोंद महापालिकेच्या नावावर नसल्याचे आढळले. त्यानुसार, या जागांची नोंद महापालिकेच्या नावावर करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.

मात्र, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम १४९ व १५० नुसार सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी सक्षम पुरावे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केवळ महापालिकेचा प्रस्ताव किंवा स्थानिक प्राधिकरणाचा दावा ग्राह्य धरून मालकी हक्काची नोंद करता येणार नसल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे आता ही सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. सर्व कागदपत्रे पूर्ण व प्रमाणित स्वरूपात सादर केल्यानंतरच फेरफार नोंदीबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही करणे शक्य होणार आहे. परिणामी, महापालिकेला आता प्रत्येक जागेचे मूळ अभिलेख, मालकी हक्क आणि हस्तांतरणाची माहिती संकलित करावी लागणार आहे. सार्वजनिक वापराच्या जागा महापालिकेच्या नावावर होण्यासाठी महसूल विभागाच्या या अटींची पूर्तता करणे हे मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.