

सांगली : स्मार्ट एलईडी पथदिव्यांमुळे होणारा विजेचा वापर व ऊर्जा बचत याची नेमकी माहिती घेणे, प्रकल्पाच्या ऑनलाईन पोर्टलवर स्मार्ट एलईडी दिव्यांचे मॅपिंग करणे, यासाठी जुन्या सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा तसेच हायमास्ट पोलवरील दिव्यांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे ऐन दिवाळीमध्ये 1250 हून अधिक दिवे बंद आहेत. परिणामी प्रमुख चौकांसह अनेक ठिकाणी रात्री अंधार असतो. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 43 हजार 800 स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र तीनही शहरातील हायमास्ट पोलवर अद्याप जुने पारंपरिक दिवेच आहेत. याशिवाय काही पोलवरही जुने पारंपरिक पथदिवे तसेच आहेत. तीनही शहरांमध्ये मिळून अशा जुन्या दिव्यांची संख्या 1250 इतकी आहे. दरम्यान, जुन्या पारंपरिक पथदिव्यांसाठी वीज वापर जास्त होत असल्याने त्याचा परिणाम ऊर्जा बचतीवर होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे हे जुने दिवे बंद करून वापर वीज युनिट व ऊर्जा बचतीची नेमकी माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी हे जुने दिवे दि. 10 ऑक्टोबरपासून पुढील 30 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
हायमास्ट पोल हे प्रामुख्याने प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आले आहेत. या पोलवरील दिवे सध्या बंद असल्याने प्रमुख चौकच अंधारात आहेत. दिवाळीच्या तोंडावर व ऐन दिवाळीमध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे 1250 दिवे बंद राहणार आहेत. दिवाळी हा सण दिव्यांचा, प्रकाशाचा मानला जातो. पण ऐन दिवाळीतच महापालिका प्रशासनाला अशा प्रकारे ‘दिवे बंद’ प्रयोग करण्याचा मुहूर्त सापडला काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.