

सांगली : कृष्णा व वारणा नदी प्रदूषणावरून सहा महिन्यात 32 उद्योगांना कारणे दाखवा नोटिसा, 44 उद्योगांना निर्देश, 25 उद्योगांना अंतरिम आदेश दिले आहेत. यामध्ये 5 साखर कारखान्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पर्यावरण हानीबद्दल सांगली महापालिकेला 33.60 कोटी, आष्टा नगरपालिका व इस्लामपूर नगरपालिकेला प्रत्येकी 2.40 कोटी, सांगली सिव्हिल हॉस्पिटलला 4.32 कोटी, दत्त इंडिया कारखान्याला 42 लाख, स्वप्नपूर्ती आसवनीला 3.60 लाख रुपये, असा एकूण 43.18 कोटी रुपयांचा दंड लावला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी दिली आहे.
नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी आपले सरकार पोर्टलवर नदी प्रदूषणांच्या अनुषंगाने तक्रार दाखल केली होती. सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय कसा संपणार? कोणामुळे प्रदूषण होते? प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय काम करते, असे प्रश्न उपस्थित केले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई मुख्यालयाकडून उप प्रादेशिक अधिकारी व क्षेत्र अधिकारी यांना उद्योगाची पाहणी करण्याकरिता देण्यात येणार्या यादी नुसार उद्योगाची व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्या-त्या उद्योगांची वेळोवेळी पाहणी करण्यात येते. मागील 6 महिन्यामध्ये 5 साखर कारखाने, 3 फौंड्री उद्योग व इतर 24 असे एकूण 32 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस, तसेच 4 साखर कारखाने, 4 फौंड्री उद्योग 5 रासायनिक उद्योग, 6 पोल्ट्री उद्योग व इतर 25 उद्योग असे एकूण 44 उद्योगांना प्रस्तावित निर्देश तसेच 4 साखर कारखाने, 3 रासायनिक उद्योग, इतर 18 उद्योग असे एकूण 25 उद्योगांना अंतरिम आदेश दिलेले आहेत.
कृष्णानदी प्रदूषणाबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी राष्ट्रीय हरित लवाद पुणे यांच्याकडे अर्ज केला होता. लवादाने दिलेल्या आदेशानसुार संयुक्त समितीची नेमणूक करून पाहणी करून अहवाल सादर केला होता. कृष्णा साखर कारखाना लि. रेठरे बुद्रुक, (ता. कराड) यांचा साखर व आसवनी विभाग, राजारामबापू पाटील साखर कारखाना यांचा साखर, आसवनी विभाग व दुग्ध विभाग, कांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नाईकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना यांचा साखर, आसवनी विभाग, व दुग्ध विभाग, सांगली महानगरपालिका, इस्लामपूर नगरपालिका इस्लामपूर, आष्टा नगरपालिका यांच्या संयुक्त पाहणीच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाया प्रस्तावित केलेल्या आहेत. ही प्रकरणे न्यायप्रवीष्ट आहेत.
पर्यावरण हानीबद्दल आष्टा नगरपालिका, इस्लामपूर नगरपालिका यांना प्रत्येकी 2 कोटी 40 लाख रुपये दंड, सिव्हिल हॉस्पिटल सांगली यांना 4 कोटी 32 लाख रुपये, सांगली, मिरज, कुपवाड महागरपालिका यांना 33 कोटी 60 लाख, श्री दत्त इंडिया प्रा. लि. यांना 42 लाख 30 हजार व स्वप्नपूर्ती आसवणी प्रकल्प यांना 3 लाख 60 हजार दंड लावण्यात आलेला आहे. हा एकूण दंड 43.18 कोटी रुपये आहे.
160 गावे, 7 शहरांचे सांडपाणी..!
कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूस सांगली जिल्ह्यात एकूण 160 गावे व 3 नगरपरिषद व 1 महानगरपालिका व 1 नगरपंचायत आहे. त्यांचे घरगुती सांडपाणी काही प्रमाणात प्रकिया न करता कृष्णा नदीत मिसळते. त्यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावली जाते. नदी काठावरील 160 छोटी व मोठी गावे यांच्यापासून अंदाजे 12 ते 15 दशलक्ष घरगुती सांडपाणी प्रतिदिन नदीमध्ये विनाप्रकिया मिसळले जाते. महानगरपालिका क्षेत्रातून निर्माण होणार्या एकूण 82 दक्षलक्ष प्रतिदिन घरगुती सांडपाण्यापैकी 59.5 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन इतक्या सांडपाण्यावर प्रकिया करण्यात येते. उर्वरित 22.5 दशलक्ष घनमीटर सांडपाणी हरिपूर नाला व शेरीनाला तसेच मिरज शहरातील नाल्यामधून कष्णा नदीत मिसळले जाते, असे किल्लेदार यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.