

सांगली : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 613 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. संबंधितांच्या प्रवेश निश्चितीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मूळ कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन ‘प्राथमिक’चे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात ‘आरटीई’तून प्रवेश देण्यासाठी 218 शाळा पात्र झाल्या आहेत. त्या शाळांमध्ये सुमारे 1 हजार 997 जागा उपलब्ध आहेत. उपलब्ध अर्जांतून प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात 1 हजार 613 पालकांना लॉटरी लागली. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स प्रती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकार्यांच्या समितीकडे सादर कराव्या लागणार आहेत. त्यासाठी 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. ‘आरटीई’ प्रवेशासाठी 3 हजार 250 पालकांनी ऑनलाईन अर्ज केले होते, त्यातील चार अर्ज अपात्र ठरले. दुबार अर्ज केल्याने ते निकाली काढण्यात आले.
आरटीई प्रवेशासाठी मुलाचा जन्मदाखला, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा (आधारकार्ड, रेशन कार्ड, वीज बिल) अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. राखीव प्रवर्गातून असल्यास जातीचा पुरावा, भाड्याने राहत असल्यास भाडेकरार, पालकाचे सचित्र ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रेही आवश्यक आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.