

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेने पकडलेल्या घोड्याची मालकी सांगण्यास अद्याप कोणीही पुढे आलेला नाही. त्यामुळे तो उपद्रवी घोडा कोंडवाड्यातच ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या घोड्याचा मालक अन्य गुन्ह्यात तुरुंगात असल्याची चर्चा आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या एका अधिकार्यांनी दिली.
शहरात मोकाट घोड्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट घोड्यांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. नुकतेच एका घोड्याने एका वृद्ध महिलेचा चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून या उपद्रवी घोड्यास जेरबंद केले. या घोड्याची महापालिकेच्या कोंडवाड्यात रवानगी करण्यात आली.
या घोड्याची मालकी सांगण्यात अद्याप कोणी पुढे आलेला नाही. दरम्यान, या घोड्याबाबत वन विभाग व पशुसंवर्धन विभागाला कळवले जाणार असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.