

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यातून येरळा व नांदणी नदीचे पात्र गेले असून अब्जावधी रुपयांची गौणखनिजरूपी संपत्ती या नदीपात्रात आहे. या नद्यांच्या पात्रातून वाळू उपशाला पूर्णपणे बंदी असताना देखील महसूल व पोलिस प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे या नद्यांच्या पात्रातून कोट्यवधी रुपयांची वाळूतस्करी होत आहे. दोन दिवसांपूर्वी चिंचणी-वांगी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्याने यावर शिक्कामोर्तब होत आहे.
कडेगाव तालुक्यातून वाहत असलेल्या या नद्यांच्या काठावरील नेवरी, वांगी, शिवणी, वडीयेरायबाग, हणमंतवडीये, रामापूर या गावांच्या हद्दीत वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. शेकडो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल विभागाचे कर्मचारी डोळ्यांवर पट्टी ओढून बसले आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. येरळा बचाव कृती समितीसह तालुक्यातील काही सामाजिक संघटनांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी वाळूउपसा होऊ न देण्याबाबत महसूल प्रशासनाला निवेदने दिली आहेत. तरीही वाळू तस्करी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतून महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष बाब म्हणजे सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात वाळूचे ढीग लावले जात आहेत. या वाळू तस्करांच्या वाहनांवर महसूल खाते कारवाई का करीत नाही? याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कडेगाव तालुक्यातील येरळा व नांदणी नद्यांच्या वाळूला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यातही या भागातून वाळू नेण्यात येत असते. मध्यंतरी येरळेच्या वाळूचा कोल्हापूर प्रवासही चर्चेचा विषय बनला होता. वाळू तस्करी रोखण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
कडेगाव तालुक्यातील वाळू तस्करी हा गंभीर विषय बनला आहे, तर काही कालावधीपासून परस्परांची वाहने पकडून देणे, टीप देणे या शंका धरून वांगी व परिसरात काही गंभीर घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे वाळू तस्करीला लगाम बसला नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
येरळा नदीतून वाळूची तस्करी होत असताना महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसताना दोन दिवसांपूर्वी चिंचणी-वांगी पोलिसांनी अवैध वाळूचा डंपर पकडल्याने महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.