

जत : सनमडी (ता. जत) येथील महात्मा फुले निवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना गेल्या 24 एप्रिलरोजी उघडकीस आली होती. एका पीडित मुलीने मुख्याध्यापकाच्या विरोधात उमदी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर मुख्याध्यापक विनोद परसू जगधने यास अटक झाली. हे प्रकरण न्यायालयीन लढाईत धसास लागेल आणि दोषीस कठोर शासन होईल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा प्रामाणिकपणाने काम करतील का? हा खरा प्रश्न आहे. संशयिताला बडतर्फ का केले नाही? असा प्रश्न पडतो.
संशयित विनोद गजाआड झाला, पोलिस कोठडी भोगून जामिनावर बाहेरही आला. सध्या उमदी येथील आश्रम शाळेत तो दररोज हजेरी लावत आहे. त्याला निलंबन कालावधीत 50 टक्के निर्वाह भत्ताही मिळत आहे. परंतु संस्थांतर्गत चौकशी समिती स्थापन झाली आहे का? सुरुवातीस मुख्याध्यापकाचे बडतर्फ करणार अशी संस्थेची भूमिका होती आता ती भूमिका मावळली का? संस्थेची भूमिका ठाम राहणार का? यासारखे प्रश्न पडतात. सनमडी आश्रमशाळेत 18 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचा मुख्याध्यापक जगधने याने विनयभंग केला होता. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत 26 एप्रिलरोजी गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनी तपासही केला. तपास अधिकारी, तथा सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी 63 व्या दिवशी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.
महात्मा जोतिराव फुले प्राथमिक आश्रम शाळेस इयत्ता नववीसाठी शिक्षण विभागाची मान्यता नसताना 20 विद्यार्थिंनी, 18 विद्यार्थी असे एकूण 38 विद्यार्थ्यांना नियमाबाह्य प्रवेश दिला होता. याच संस्थेच्या एका शाखेत हा प्रवेश दाखवला, मात्र यात एका पीडित विद्यार्थिनीस प्रवेश दिला होता. नववीच्या विद्यार्थिनीची नियमबाह्य निवासाची सोय केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाशी केवळ संबंधित मुख्याध्यापक जबाबदार नाही, तर संस्थाही तितकीच जबाबदार आहे.
18 एप्रिलरोजी संशयिताकडून विद्यार्थिनीचा विनयभंग.
24 एप्रिलरोजी सुटी पडल्याने मुली यांच्या गावी सोडण्यास मुख्याध्यापक गेला असता त्यास पालकाकडून मारहाण.
24 एप्रिल- प्रकरण दाबले गेल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
पीडित मुलींची संख्या सात असल्याची चर्चा, परंतु एकाच मुलीकडून तक्रार दाखल.
25 एप्रिलरोजी सर्वप्रथम दैनिक ‘पुढारी’तच बातमी. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे. तातडीने सनमडी आश्रमशाळेस भेट.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग व पोलिस विभाग, आमदार गोपीचंद पडळकर, लोकप्रतिनिधी यांची आश्रम शाळेस भेट.
26 एप्रिल- उमदी पोलिसात संशयित मुख्याध्यापक विनोद जगधने याच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.
27 एप्रिल- मुख्याध्यापक जगधने यास अटक, तीन दिवसाची पोलिस कोठडी.
28 एप्रिल- शाळेची मान्यता का रद्द करू नये? इतर मागास बहुजन कल्याण विभागाची संस्थेस नोटीस.
29 एप्रिल- प्रादेशिक संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांची या संदर्भाने पुणे येथे सांगली विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक.
26 जून- तपास अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्याकडून दोषारोप पत्र न्यायालयात सादर.