

जत शहर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठी माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात शुक्रवारी पुन्हा चर्चा झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही स्थितीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून एकत्र आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे न झाल्यास तालुका स्तरावर ‘स्थानिक विकास आघाडी’ स्थापन करण्याचाही एक मतप्रवाह आहे, त्यासाठी नेत्यांमध्येही चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या दोन नेत्यांच्या गाठीभेटीकडे पाहिले जाते.
माजी खासदार पाटील शुक्रवारी जत तालुक्याच्या दौर्यावर होते. या दौर्यादरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. माजी आमदार जगताप यांच्या कार्यालयात बंद खोलीत दोघांमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हास्तरीय पातळीवर महाविकास आघाडी स्थापन करण्याची शक्यता तपासण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत न झाल्यास, तालुका स्तरावर लोकहितासाठी ‘विकास आघाडी’ उभारून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषद निवडणुका एकत्रित लढवण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. बैठकीत असेही स्पष्ट करण्यात आले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट गरजेची आहे. मागील निवडणुकांतील चुका टाळून, एकदिलाने आणि एकमुखाने सर्व निवडणुका लढवाव्यात, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.