

सांगली : भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषदेचे संग्रामसिंह देशमुख आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात चुरस होती. त्याशिवाय आणखी चौघे इच्छुक होते. मात्र या सहाजणांऐवजी सम्राट महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाडिक यांनी बाजी मारल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग यांची फेरनिवड झाली आहे.भाजप पदाधिकारी निवडीसाठी गेल्या काही दिवसापासून हालचाली सुरू होत्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा होती. निशिकांत पाटील हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्याजागी माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकीत ग्रामीणच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांकडून इच्छुकांचे प्राधान्यक्रम घेण्यात आले होते.
संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख या दोघांशिवाय शिवाजी डोंगरे, मिलिंद कोरे, विलास काळेबाग, राजाराम गरुड हे 6 जण इच्छुक होते. मात्र सम्राट महाडिक यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी देत राज्य नेतृत्वाने धक्का दिला आहे. कडेगाव तालुक्याला यापूर्वी संधी मिळाली आहे, तर वाळवा तालुक्यातून निशिकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा वाळवा तालुक्याला संधी देण्याच्या निमित्ताने सम्राट महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळवा, शिराळा तालुक्यात पक्ष भक्कम करण्याच्या दृष्टीने भाजपने सम्राट महाडिक यांना पसंती दिली आहे. दरम्यान, भाजप नेतृत्वाने शहरात प्रकाश ढंग यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. पंधरा दिवसापूर्वी या निवडीसाठी शहर आणि ग्रामीण पक्षनिरीक्षकांनी बैठक घेऊन विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांची मते घेतली होती. त्यांच्याकडून इच्छुकांचे प्रत्येकी तीन प्राधान्यक्रम घेतले होते.
शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह पृथ्वीराज पवार,विश्वजित पाटील, अॅड. स्वाती शिंदे, पृथ्वीराज पाटील, पांडुरंग कोरे आदी इच्छुक होते.प्रकाश ढंग यांच्या नियुक्तीस दीड वर्ष झाले आहे. त्यांच्या कार्यकाळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक पार पडली. या दोन्ही निवडणुकीत त्यांनी शहराध्यक्ष म्हणून समन्वयाची मोठी भूमिका बजावली होती. पक्षाकडून आलेले कार्यक्रमही त्यांनी राबवले. भाजपच्या सक्रिय सदस्यता नोंदणीत सांगली शहर आघाडीवर राहिले. शिवाय आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन ढंग यांनाच शहर जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य नेतृत्वाने घेतला आहे.